चंद्रपूर: देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; ६ ठार, ६ जखमी
चंद्रपूर: जिल्ह्यातील मूल तालुक्यातील केसलाघाट येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव स्कॉर्पिओ गाडीने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ६ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व मृत व्यक्ती चंद्रपुरातील असून गोंदिया येथून देवदर्शनाहून परतत असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली.
अपघातात पती-पत्नी ठार
केसलाघाट गावात बुधवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. अपघातातील जखमींना तातडीने मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की स्कॉर्पिओचा अर्धा भाग ट्रकमध्ये घुसला. हा भाग कापला गेल्याने अपघाताची भीषणता वाढली. जितेंद्र पटपल्लीवार, मनीषा भोयर, अंकिता पेटकुले, क्रिश पाटील, सोमी पाटील, शीला पाटील, रेखा खटिकर अशी स्कॉर्पिओतील काहींची नावे हाती आली असून मृत व जखमींचा नेमका तपशील मिळालेला नाही.