राज्य शासनाकडून हत्तीबेटास "ब"वर्ग पर्यटनाचा दर्जा
उदगीर---
लातूर जिल्ह्यातील मिनी माथेरान असलेल्या हत्तीबेट पर्यटन स्थळास राज्य शासनाने"ब"वर्ग पर्यटनाचा दर्जा देण्यात आला असल्याचे आदेश राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने मंगळवारी जारी केले आहेत.
लातूर जिल्ह्याच्या उदगीर ,देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्याच्या सीमेवर असलेल्या हत्तीबेट पर्यटन स्थळाच्या ठिकाणी सुमारे 600 वर्षांपूर्वीची सद्गुरू गंगानाथ महाराज यांची संजीवन समाधी,कोरीव लेण्या, गुहे याबरोबरच हैदराबाद मुक्ती संग्रामात निजामा विरुद्ध लढा दिलेले हे ठिकाण आहे. वन विभागाने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केल्यामुळे दररोज हत्तीबेटास भेट देणाऱ्या पर्यटक व भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हत्तीबेट आता मिनी माथेरान बनले आहे.
हत्तीबेटास "ब"वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव भाजपा चे तत्कालीन जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांनी जानेवारी 2018 मध्ये राज्य शासनाकडे दाखल केला होता. उदगीर पंचायत समिती, लातूर जिल्हा परिषद व उदगीर येथे पार पडलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनासह जिल्हा नियोजन व विकास समितीच्या सभेत तत्कालीन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी हत्तीबेट पर्यटन स्थळास"ब"वर्ग पर्यटनाचा दर्जा देण्याचा ठराव मंजूर करून घेतला होता. शिवाय या पर्यटनाच्या विकासासाठी 10 कोटी रुपयांची मागणीही संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली होती. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हत्तीबेटाच्या विकासासाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा उदगीरच्या सभेत केली होती. मात्र निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे हे काम थांबले होते.
**राज्यमंत्री बनसोडे यांनी शब्द पाळला---।
निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर उदगीर मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार व सध्याचे राज्याचे सांसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी हत्तीबेट पर्यटन स्थळास"ब"वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून देण्याचे अभिवचन दिले होते. त्यानुसार राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून हत्तीबेटाचा हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. त्यानुसार राज्यशासनाने मंगळवारी हत्तीबेटास"ब"वर्ग पर्यटनाचा दर्जा देण्याचे आदेश जारी केले आहेत.
राज्य शासनाकडून हत्तीबेटास "ब"वर्ग पर्यटनाचा दर्जा