*कोरोना आला ...

*कोरोना आला आणि आठवण झाली*
       कोरोना आला आणि आठवण झाली सुंदर आयुष्य जगण्याची.आपण तर आयुष्य जगण्यासाठी धावतोय ,आपण आपल्या मुलांना आई वडिलांना काही कमी तर पडणार नाही ना? यांना चांगले शिक्षण मिळावे ,आई वडिलांचे आरोग्य चांगले असावे ते आनंदी, सुखी असावे यासाठीच धावतोय कारण हेच आपले आयुष्य. असे जरी असले तरी हे आयुष्य जगण्यासाठी लागणार आहे पैसा.सर्व काही आहे ते आज पैशांवरच आणि म्हणूनच या पैशामागे धावतोय आपण.पैसा असेल तरच आपल्याला समाजात मान, सन्मान, भौतिक सुखसोयी मिळतील अशी आपली मानसिकता बनली आहे.म्हणूनच आपण गाव सोडून तालुक्याच्या ठिकाणी ,तालुका सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी, जिल्हा सोडून महानगराच्या ठिकाणी, महानगर सोडून परदेशी पोहोचला आहोत आणि आपल आयुष्य इथेच थांबतो आहोत.
     आपल्या आयुष्यात असणारे आई वडील, बहीण भाऊ ,नातेवाईक मित्र परिवार ही सजिव संपत्ती राहिली ती मायदेशी आणि आपण हेच माझे आयुष्य , यांच्यासाठीच मला जगाचे आहे असें म्हणून पोहोचलोय परदेशी.
    जरी पोहोचलो परदेशी तरी नाही नाही ते खाऊ लागलो, मनाला वाटेल तसे वागू लागलो ,नाही आरोग्याची ,नाही नाशवंत देहाची  काळजी. 
     आपण धावतोय फक्त निर्जीव संपत्ती मागे आपले अस्तीत्व टिकवण्यामागे, आपले अस्तित्व टिकवण्यासाठी इतरांचे अस्तित्व मान्यच करायचे नाही यामागे .या धावण्याच्या नादात आपण सगळं काही विसरून गेलो आणि हरवून बसलो आपल्या या सजिव संपत्तीला .ज्या निसर्गाने आपल्याला एवढे दिले , आपण त्याला काय देतोय? दु:खच दु:ख आपल्या सुखसोयीसाठी तोडतोय आपण आनंदाने झाडी पण नवीन झाड लावण्याचा विचारही करत नाही.ज्या आईवडिलांनी आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, मोठे केल, परदेशी पाठवलं त्यांना आपण काय देतोय?पैसा आणि एकटेपणा .ज्या मित्रांच्या सहकार्यामुळे आपण परदेशी पोहोचले त्यांना काय देतोय ?
        आपल्याला माहिती आहे आपण नाशवंत आहोेत तरीही आपण इतक धावतेाय म्हणूनच की काय हा कोरोना आला. बरे झाले कोरोना आला आणि आपल्याला येथेच थांबवला ,विचार करायला लावला ,नक्की आपले आयुष्य किती शिल्लक आहे, नक्की आपल्याला काय मिळवायचे आहे, काय करायचे आहे,याचा.
   आज करोना आला आणि आठवण झाली ती मायदेशी परत येण्याची, आई वडिलांना प्रेम ,माया, ममता देण्याची ,मित्रांसोबत बालपणीच्या आठवणी काढून तासंतास गप्पा मारण्याची, समाजाला निसर्गाला प्राणी मात्राला ही वेळ देण्याची यासोबतच आठवण झाली ती स्वतःची ,स्वतःच्या आरोग्याची ,स्वतःचे छंद जोपासण्याची ,स्वतःची आवड जोपासण्याचा, स्वतःचे मत व्यक्त करण्याची कारण कोरोना आला आणि त्यांनी सर्व काही बंद केले आणि म्हणूनच मिळाला हा वेळ याच वेळेतून आठवण झाली ती आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला दिलाच पाहिजे वेळ याची.
     उत्पत्ती ,स्थिती आणि लय हा तर सृष्टीचा अटळ नियम आहे. हजारो वेळा ही युग बदलली आहेत. युगे अठ्ठावीस तर तो विठोबाच विटेवरी उभा आहे .आता आपण जागी झालोच पाहिजे, वेळ दिलाच पाहिजे आपल्या आयुष्याला आणि ज्यांनी आपल्याला आठवण करून दिली त्या कोरोनाला ही कारण तोहि वेळ झाली की निघुन जाईल.
        कोरोना आला आणि आठवण झाली आयुष्य सुंदर आहे ,जगता आले पाहिजे .याची  .


शिवणखेडे माया लक्ष्मीकांत.
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर.
मो.९५११८२५४४०.